Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव तहसील कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य; कर्मचाऱ्यांवर ठपका, नागरिकांचा तीव्र संताप

शेवगाव : तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या शेवगाव तहसील कार्यालयात स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्य प्रवेशद्वा

नांदेड जिल्हा परिषद मुख्यालयात अस्वच्छतेचा विळखाड्रेनेज तुंबल्याने दुर्गंधी; कर्मचारी व नागरिक हैराण
कचरा समस्येवर कर्जतकरांचा संताप; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
साळवण देवीच्या प्रवेशद्वारावरच चिकनची दुकाने; दुकाने हटवण्याची मागणी; नागरिक संतप्त; श्रीगोंदा नगरपरिषदेत ठिय्या 

शेवगाव : तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या शेवगाव तहसील कार्यालयात स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळील दिव्यांगांसाठीच्या रॅम्पवर कचऱ्याचे ढीग साचले असून, लगतच्या भिंती गुटखा व मावा थुंकल्यामुळे लालभडक झाल्या आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवणाऱ्या प्रशासनाच्याच दारात अस्वच्छतेचे चित्र दिसत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येत असतात. मात्र, कार्यालयाच्या दर्शनी भागाचीच दुरवस्था झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रॅम्पच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिक पिशव्या, कागदाचे तुकडे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच सुकलेला कचरा साचलेला दिसून येत असून परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, कार्यालयीन वेळेत बाहेरील व्यक्तींपेक्षा कर्मचाऱ्यांचाच वावर अधिक असतो. त्यामुळे थुंकणे व अस्वच्छता करणारे प्रकार कर्मचाऱ्यांकडूनच होत असल्याचा आरोप होत आहे. काही अधिकाऱ्यांकडूनच पान, गुटखा व मावा मागवण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचेही प्रत्यक्ष अनुभवातून समोर आले आहे.

यासंदर्भात आदर्श गाव वाघोली येथील उमेश भालसिंग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, तहसील कार्यालयातच स्वच्छतेच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन होताना दिसत आहे. कर्मचारी व अधिकारी त्यांच्या दालनात तसेच खिडक्यांजवळ गुटखा, पान व तंबाखू सेवन करताना दिसतात. “रक्षकच भक्षक झाले तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे नागरिकांना सांगितले जाते; मात्र त्याची अंमलबजावणी प्रथम शासकीय कार्यालयांतूनच होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच काही अधिकाऱ्यांकडून “बाहेर जात असशील तर पान-मावा घेऊन ये” अशा सूचना दिल्या जात असल्याचे आपण स्वतः ऐकले असल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या असीमा मित्तल यांनी स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घेत, चूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई करून घेण्याचे आदेश दिले होते. अशा प्रकारची शिस्तबद्ध अंमलबजावणी पुन्हा करण्यात आल्यास या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तहसीलदारांसह विविध विभागप्रमुखांची कार्यालये याच इमारतीत असतानाही मुख्य प्रवेशद्वारावरील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसते. दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेल्या रॅम्पची देखभाल होत नसल्याने शासनाच्या ‘दिव्यांग-स्नेही’ धोरणालाही धक्का बसत आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याची गंभीर दखल घेऊन तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS