पाटणा : बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या उत्साहात पार पडला. पाटणा येथील गांधी मैदा

पाटणा : बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या उत्साहात पार पडला. पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित भव्य सोहळ्यात ३२ नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांचाही नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, त्यांच्या समावेशाची राज्याच्या राजकारणात विशेष चर्चा रंगली आहे.
राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जनता दल (युनायटेड) चे नेते नितीश कुमार तसेच सत्ताधारी आघाडीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या विस्तारामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटक पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले. भारतीय जनता पक्ष, जनता दल (युनायटेड), लोक जनशक्ती पक्ष, हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांतील नेत्यांना मंत्रीपदे देत राजकीय आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
माजी मंत्री श्रवण कुमार, अशोक चौधरी आणि लेसी सिंग यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले. भाजपच्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये रामकृपाल यादव, नितीश मिश्रा आणि दिलीप जैस्वाल यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला. जनता दल (युनायटेड) कडून रत्नेश सदा, मदन साहनी आणि शीला कुमारी यांनी शपथ घेतली. नितीश कुमार राज्यसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण करत आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
सत्ता संतुलनासह प्रादेशिक संतुलन साधण्याचा प्रयत्न
बिहारच्या मंत्रिमंडळात श्रेयसी सिंग, मोहम्मद जामा खान आणि लखेंद्र कुमार रोशन यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे जितन राम मांझी आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. डॉ. संतोष कुमार सुमन आणि भगवान सिंह कुशवाहा यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.

COMMENTS