परळी: सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याची अत्यंत गंभीर आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. या
परळी: सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याची अत्यंत गंभीर आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. या ट्रॅव्हल्समध्ये परळीतील दोघांसह तब्बल ४० ते ४२ प्रवासी अडकले असून, जीव वाचवण्यासाठी सर्व प्रवासी ट्रॅव्हल्सच्या टपावर बसल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील रहिवासी रुपेश झंवर आणि जान्हवी झंवर हे दोघे या ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते. सुरतहून निघाल्यानंतर वापी ते अंबाटी गावादरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे ही ट्रॅव्हल्स रात्रीच बंद पडली. या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मदतीआधीच ड्रायव्हर पसार; कुटुंबाचा संपर्क तुटला
पुराच्या पाण्यात गाडी अडकल्याचे लक्षात येताच प्रवाशांना त्या स्थितीत सोडून ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रवाशांनी आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
रात्रीपासूनच रुपेश झंवर व जान्हवी झंवर यांचा कुटुंबीयांशी असलेला संपर्क तुटल्यामुळे परळीतील त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसडले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू करावे, अशी तीव्र मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.

COMMENTS