मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत सुरक्षेसाठी नियुक्त असलेले पोलिस ह

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत सुरक्षेसाठी नियुक्त असलेले पोलिस हवालदार श्याम सोनवणे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि जबाबदारी पार पाडण्यात झालेल्या त्रुटींमुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
श्याम सोनवणे हे मुंबई पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा विभागात कार्यरत होते. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीत निष्काळजीपणा सिद्ध झाल्यानंतर अखेर त्यांना सेवाबाह्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्या पुत्र झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडात कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोई याचे नाव समोर आले होते. या प्रकरणात कठोर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत आतापर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी श्याम सोनवणे हे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर होते. मात्र हल्ल्यानंतर त्यांनी तातडीने प्रतिकार केला नाही किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपेक्षित पावले उचलली नाहीत, असा आरोप चौकशीत करण्यात आला.

COMMENTS