मुंबई : महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि उद्योगप्रधान राज्य बनविण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, पायाभूत सुविधा, नाविण्यप

मुंबई : महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि उद्योगप्रधान राज्य बनविण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, पायाभूत सुविधा, नाविण्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण,तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. या सर्व शक्तींचा सहयोग साधणार्या अर्थव्यवस्था भविष्याचे नेतृत्व करणार असल्याने ही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवेने प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
सीआयआय’च्या वार्षिक बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील उद्योगवाढ, परकीय गुंतवणूक, ऊर्जा धोरण आणि भविष्यातील आर्थिक दिशा यावर भाष्य करताना त्यांनी पुढील पाच वर्षांत घरगुती वीजदर 26 टक्क्यांनी कमी होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. उद्योग क्षेत्राच्या वार्षिक परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. अभियांत्रिकी, नवउद्योग, परकीय गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या आर्थिक क्षमतेचा प्रभावी वापर करून महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील औद्योगिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी वीजदर नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी बहुवर्षीय वीजदर धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी दरवर्षी वीजदरात सुमारे नऊ टक्क्यांची वाढ होत होती. मात्र, नव्या धोरणानुसार उद्योग क्षेत्रासाठी दरवर्षी दोन ते तीन टक्के दरकपात करण्यात येणार आहे. घरगुती ग्राहकांसाठीही मोठा दिलासा देत पुढील पाच वर्षांत वीजदर तब्बल 26 टक्क्यांनी कमी होतील, असा दावा त्यांनी केला. या निर्णयामुळे उद्योगांची उत्पादनक्षमता वाढेल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि नागरिकांच्या मासिक खर्चात बचत होईल, असेही त्यांनी नमूद केले. ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांमुळे महाराष्ट्र उद्योगांसाठी अधिक स्पर्धात्मक राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खा. राहुल गांधी म्हणजे रिजेक्टेड माल
काँगे्रस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाची खिल्ली उडवली होती. त्याचा शेलक्या शब्दांत समाचार घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा अर्थ राहुल गांधींना कळला नाही, तर त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समज कमी आहे. पण तो जनतेला कळला आहे. त्यामुळे जनता प्रतिसाद देईल. देशामध्ये सर्वात नाकारलेला नेता, रिजेक्टेड माल हे राहुल गांधी आहेत. त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

COMMENTS