इंदूर: एका बंद खोलीत सर्वत्र धूर पसरला होता, खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झाले होते आणि एका बाजूला तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला होता.
इंदूर: एका बंद खोलीत सर्वत्र धूर पसरला होता, खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झाले होते आणि एका बाजूला तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला होता. पहिल्या दृष्टीने ही आत्महत्या वाटत होती, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे या मृत्यूला अचानक वेगळेच वळण मिळाले. मध्य प्रदेशातील इंदूरच्या खजराना भागातील तपेश्वरी बाग कॉलनीत घडलेली ही धक्कादायक घटना आत्महत्येची नसून क्रूर हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खजराना भागातील एका भाड्याच्या खोलीत बँक कर्मचारी असलेल्या पलक नावाच्या तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. ती गेल्या दोन दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हती. घटनास्थळाची परिस्थिती पाहून सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तरुणीचा मृत्यू आगीत होरपळून झाला नसून, आधी गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना मिळाला मुख्य सुगावा
घटनास्थळावरून पुरावे गोळा करताना पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये एक संशयित तरुण हातामध्ये पेट्रोलचा डबा घेऊन घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसून आला. याच महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून थेट आरोपीला बेड्या ठोकल्या.
लग्नाला नकार दिल्याने हत्या करून जाळले
मयंक शाक्य असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस तपासात मयंक आणि पलक हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये लग्नावरून तीव्र वाद सुरू होते. पलकने मयंकसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच रागातून मयंकने आधी तिची गळा दाबून हत्या केली आणि नंतर हत्येचा पुरावा मिटवण्यासाठी व प्रकरणाला आत्महत्येचे रूप देण्यासाठी तिच्या अंगावर आणि खोलीत पेट्रोल ओतत आग लावून दिली.
आरोपी मयंक शाक्यवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल
हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मयंकने हा सर्व भयानक बनाव रचला होता, परंतु वैद्यकीय अहवालामुळे त्याचे हे कृत्य उघडीस आले. खजराना पोलिसांनी आरोपी मयंक शाक्य याला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

COMMENTS