कर्जत : शहरातील टपरीधारक व छोटे दुकानदारांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, १३ ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत य
कर्जत : शहरातील टपरीधारक व छोटे दुकानदारांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, १३ ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सदस्य ऍड. अरुण जाधव यांनी दिली. पुनर्वसनाशिवाय टपरीधारकांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील टपरीधारक व दुकानदारांना काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर ‘कोणावरही अन्याय होणार नाही’, असे सांगितले जात असल्याचा आरोप करत जाधव यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “नोटीस देऊन आता अन्याय होणार नाही, असे म्हणणे हा दुटप्पीपणा आहे. हा दुटप्पीपणा सोडावा,” अशी टीका त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुनर्वसनाशिवाय एकही टपरी हटवू नये, नियोजित ठिकाणी शॉपिंग सेंटर उभारून टपरीधारकांचे कायदेशीर पुनर्वसन करावे, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बायपास रस्त्याचा पर्याय तपासावा आणि तोपर्यंत कोणतीही बळजबरीची कारवाई करू नये, यांचा समावेश आहे. या प्रश्नावर १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात कर्जत शहरातील सर्व टपरीधारक, छोटे दुकानदार व व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

COMMENTS