Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताला अर्जेंटिनाकडून एलपीजीच्या मदतीचा हात

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण युद्धस्थिती आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील अडथळ्यांमुळे देशात घरगुती वायूचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती नि

गॅस, पेट्रोल बरोबरच विश्वासाची टंचाई !युद्धाच्या जनसामान्यांना झळा; मुबलकचा दावा, मग गर्दी का ?
राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल व एलपीजी सुरळीत; अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण युद्धस्थिती आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील अडथळ्यांमुळे देशात घरगुती वायूचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली होती. अशा संवेदनशील परिस्थितीत दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाने पुढाकार घेत भारताच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तब्बल वीस हजार किलोमीटर अंतरावरून होणारा हा पुरवठा भारतासाठी दिलासादायक ठरत आहे.
भारतामधील अर्जेंटिनाचे राजदूत मारियानो अगस्टिन कौसेनो यांनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी त्यांचा देश कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. भारताने अवलंबलेल्या ऊर्जा विविधीकरणाच्या धोरणाचे त्यांनी कौतुक करत अर्जेंटिनाकडे नैसर्गिक वायूचे मोठे साठे उपलब्ध असल्याचे नमूद केले. यापूर्वीही अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय वायू आणि तेल क्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी भारत दौरे करून केंद्रातील ऊर्जा मंत्र्यांसह विविध कंपन्यांशी चर्चा केली होती. त्यातूनच या सहकार्याची पायाभरणी झाल्याचे मानले जात आहे. अर्जेंटिनाकडून चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे पन्नास हजार टन वायू भारतात पाठवण्यात आला आहे. मागील संपूर्ण वर्षभरात झालेल्या पुरवठ्याच्या तुलनेत हा आकडा दुपटीहून अधिक आहे. युद्धस्थिती तीव्र होण्यापूर्वीच बहिया ब्लांका बंदरातून मोठ्या प्रमाणात वायू भारतात पोहोचला होता. त्यानंतरही संकटाच्या काळात अतिरिक्त माल पाठवून अर्जेंटिनाने आपली तयारी दाखवून दिली. भारताच्या वायू आयातीपैकी मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो. या मार्गावर निर्माण झालेल्या अडचणींमुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने देशांतर्गत पातळीवरही विविध पावले उचलली आहेत. हॉटेल आणि खाद्य व्यवसायांसाठी वापरल्या जाणार्‍या वायूचा कोटा वाढवण्यात आला असून घरगुती वापरासाठी पर्यायी व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.

COMMENTS