नांदेड - शहरातील मुख्य व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या वजिराबाद परिसरात व्यापार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वज
नांदेड – शहरातील मुख्य व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या वजिराबाद परिसरात व्यापार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वजिराबाद येथील मुख्य रस्त्यावर गेल्या सात वर्षांपासून व्यवसाय करणार्या प्रसिद्ध ‘केक हब’ या दुकानात काही तरुणांनी हातात घातक शस्त्रे घेऊन बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानातील कर्मचार्यांना धमकावत रोकड लुटण्यासह फुकट माल घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारात दुकानातील एका कर्मचार्याला गंभीर मारहाण झाल्याची माहिती आहे. गजबजलेल्या वजिराबाद बाजारपेठेत घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवसायाच्या ठिकाणीच शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण केली जात असेल, तर शहरातील व्यापार्यांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवायची, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या डीव्हीआरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ही घटना त्यात नोंदवली गेली नसल्याची माहिती आहे. मात्र, घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या काही जागरूक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. दिवसाढवळ्या, मुख्य रस्त्यावर आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या व्यापारी परिसरात अशा प्रकारे शस्त्रे घेऊन दुकानात प्रवेश करण्याचे धाडस होत असेल, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा गंभीर प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे. ‘केक हब’ हे गेल्या सात वर्षांपासून परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करून व्यवसाय करणारे प्रतिष्ठान असल्याचे सांगण्यात येते. अशा व्यावसायिकाच्या दुकानात घुसून कर्मचार्याला मारहाण, धमकी आणि मालमत्ता लाटण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार केवळ एका दुकानावर झालेला हल्ला म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा नाही. आज एका व्यापार्याच्या दुकानात गुंडगिरी झाली; उद्या दुसर्या व्यापार्याच्या प्रतिष्ठानात अशीच घटना घडणार नाही, याची हमी कोण देणार? व्यापार्यांनी दिवसभर कष्ट करून व्यवसाय उभा करायचा आणि काही समाजकंटकांनी शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्या मेहनतीवर डल्ला मारायचा, हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाऊ नये. या घटनेचा उपलब्ध व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुरावे तातडीने तपासात घेऊन संबंधित आरोपींची ओळख पटवावी, त्यांना ताब्यात घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे. वजिराबादसारख्या शहराच्या मध्यवर्ती व्यापारी भागात व्यापारी आणि कर्मचारी सुरक्षित नसतील, तर नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या घटनेला केवळ किरकोळ वादाचे स्वरूप न देता पोलिस प्रशासनाने गांभीर्याने तपास करणे आवश्यक आहे. गुंडगिरीला वेळीच लगाम घातला नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण व्यापारी शहराला भोगावे लागू शकतात. व्यापार्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? आता नांदेडकरांना केवळ आश्वासन नव्हे, तर ठोस कारवाई हवी आहे.

COMMENTS