मोफत नाश्ता करून उलट दारूसाठी 5 हजारांची खंडणीची मागणी; लोखंडी रॉड, काठ्या व बिअरच्या बाटलीने हल्ला, दोघे गंभीर जखमी बीड: बीड शहरात मोफत नाश्त
मोफत नाश्ता करून उलट दारूसाठी 5 हजारांची खंडणीची मागणी; लोखंडी रॉड, काठ्या व बिअरच्या बाटलीने हल्ला, दोघे गंभीर जखमी

बीड: बीड शहरात मोफत नाश्ता करून त्याचे पैसे मागितल्याच्या किरकोळ कारणावरून नाश्ता सेंटर चालक आणि त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी आधी बिअरची बाटली डोक्यात फोडून जखमी केले, त्यानंतर तासाभराने लोखंडी रॉड व काठ्या घेऊन पुन्हा येत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रीरामनगर येथील रहिवासी दिलीप साहेबराव वायबट (वय 38) हे बंब सर्कल परिसरात बालाजी नाश्ता सेंटर चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी आरोपी स्वप्निल भाऊसाहेब शिंदे (रा. श्रीरामनगर, बीड) हा आपल्या तीन अनोळखी साथीदारांसह कारमधून नाश्ता करण्यासाठी आला होता. नाश्ता झाल्यानंतर दिलीप वायबट यांनी बिलाची रक्कम मागितली असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर दारू पिण्यासाठी 5 हजार रुपये देण्याची मागणी करत वाद घातला.
या वादादरम्यान आरोपी स्वप्निल शिंदे याने दिलीप यांचे चुलत भाऊ शिवम वायबट यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर जखमी केले. घटनेनंतर सुमारे तासाभराने आरोपी पुन्हा लोखंडी रॉड व काठ्या घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी दिलीप वायबट यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी दिलीप वायबट यांच्या लेखी फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्निल शिंदे व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध प्राणघातक हल्ला, खंडणी व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर करीत आहेत. घटनेमुळे शहरात खंडणीखोर व गुंडांच्या वाढत्या धाडसाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS