बनावट आरसी बुक, खोटा करारनामा अन् विक्रीचा बनाव; चकलांबा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा गेवराई : भाड्याने आणलेली चारचाकी गाडी स्वतःच्या मालकीची
बनावट आरसी बुक, खोटा करारनामा अन् विक्रीचा बनाव; चकलांबा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा
गेवराई : भाड्याने आणलेली चारचाकी गाडी स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून, बनावट आरसी बुक आणि खोटा खरेदी-विक्री करारनामा तयार करत एका शिक्षकाची तब्बल 3 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी सदाशिव जरांगे (वय 46, रा. मातोरी, ता. शिरूर कासार) हे वरंगळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी अपघाताच्या प्रसंगी मदत करताना त्यांची ओळख सौरभ राम साबळे (रा. कौडगाव साबळा, जि. बीड) याच्याशी झाली होती. ओळखीचा फायदा घेत सौरभ साबळे याने जरांगे हे नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर कमी चाललेली मारुती ब्रेझा कार विकायची असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
पुढे प्रणव प्रवीण शिंदे (रा. यशवंतनगर मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) याला गाडीचा मूळ मालक उत्तम ढोम असल्याचे भासवण्यात आले. आरोपींनी बनावट आरसी बुक आणि खोटा खरेदी-विक्री करारनामा दाखवत कारचा व्यवहार 7 लाख 50 हजार रुपयांत निश्चित केला. विश्वास बसावा म्हणून विविध कागदपत्रे दाखवून जरांगे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 3 लाख 50 हजार रुपये स्वीकारण्यात आले.
मात्र, काही वेळातच गाडीचे खरे मालक जीपीएस ट्रॅकरच्या आधारे संबंधित वाहनापर्यंत पोहोचले. त्यावेळी ही कार झूम कार या सेवेतून भाड्याने घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपींनी भाड्याने घेतलेल्या वाहनाची स्वतःची मालमत्ता असल्याचा बनाव करून विक्रीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षक शिवाजी जरांगे यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून सौरभ राम साबळे आणि प्रणव प्रवीण शिंदे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश करहाडकर करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट कागदपत्रे कोठे आणि कशी तयार करण्यात आली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS