Homeताज्या बातम्या

येरवडा कारागृहात भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळाकीर्तनातून बंद्यांना दिला सदाचाराचा संदेश

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा खुले जिल्हा कारा

यंदाही बारावीच्या निकालात मुलींची बाजी; निकाल घसरला ; राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के
गुरुकुलमध्ये आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन 
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘OSD’ सांगून फसवणूक


पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा खुले जिल्हा कारागृहात आयोजित करण्यात आलेला प्रासादिक कीर्तन सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला कारागृहातील बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कारागृह विभागाच्या ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ या ध्येयाला बळकटी देण्यासाठी येरवडा खुले कारागृह प्रशासनाकडून विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन सोहळ्यात प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. निलेश महाराज झरेगावकर यांनी आपल्या ओजस्वी आणि रसाळ वाणीने संतपरंपरेतील विचार मांडले. कीर्तनादरम्यान भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज तसेच वाल्मिकी ऋषी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा उल्लेख करत त्यांनी मानवी जीवनातील मूल्ये, आत्मपरीक्षणाचे महत्त्व आणि चुकांमधून सुधारण्याची संधी यावर प्रभावी मार्गदर्शन केले. कीर्तनातील अभंग, गजर आणि संतविचारांमुळे संपूर्ण कारागृह परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्यांचा उल्लेख करून जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश दिला. कारागृहातील बंद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्याच्या जडणघडणीसाठी अशा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुमारे 150 बंद्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या सक्रिय उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) डॉ. सुहास वारके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि बंदी बांधवांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्‍वास आणि समाजोपयोगी जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS