बीड : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बीड शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली.

बीड : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बीड शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मंगळवारी (दि. 14) भीम अनुयायांचा जनसागर उसळला होता. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने नागरिकांनी अभिवादनासाठी उपस्थिती लावली.
कार्यक्रमात पूज्य भिक्खु धम्मशील थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील ग्रहण करवून बौद्ध धम्मातील मूलभूत तत्त्वांचा स्वीकार करून घेतला. त्यानंतर उपस्थितांनी महामानवांच्या चरणी पुष्पवृष्टी करून अभिवादन केले या प्रसंगी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, एसडीएम कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करून अभिवादन केले. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, आमदार संदिप क्षीरसागर तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयभीम महोत्सव ठरला विचारांचा जागर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने 5 ते 14 एप्रिलदरम्यान आयोजित ‘जयभीम महोत्सव’ विविध उपक्रमांनी संपन्न झाला. व्याख्याने, रक्तदान शिबिरे, अठरा तास अभ्यास उपक्रम, भीमगीत गायन, नृत्य स्पर्धा तसेच भव्य संगीत रजनी यांसारख्या कार्यक्रमांमुळे हा महोत्सव केवळ उत्सव न राहता विचारप्रवर्तक चळवळ ठरला.
समता ज्योत ठरली प्रेरणादायी परंपरा
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा समता ज्योतीचा प्रवास सामाजिक ऐक्य आणि परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला. मान्यवरांच्या हस्ते ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.
भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले
जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन बशीरगंज चौक, बलभीम चौक, माळीवेश मार्गे आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचली. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक देखावे आणि घोषणांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

COMMENTS