कोपरगाव: पावसाळ्यातील संभाव्य आजारांचा प्रसार वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेवून प्रतिबंधक उपा

कोपरगाव: पावसाळ्यातील संभाव्य आजारांचा प्रसार वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेवून प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरात कुठेही डासांची पैदास होणार नाही याची दखल घेऊन आरोग्य विभागाने पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे स्पष्ट निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
मंगळवारी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव एकात्म आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहचवणे, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून रुग्णांना दर्जेदार सुविधा देणे, रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत सविस्तर चर्चा झाली. आरोग्य विभागाने अलर्ट राहून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागासाठी जितकी कामे मंजूर करून आणली तितकी कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती. पूर्वी केवळ घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्ष कामे झाली नाहीत. सध्या कोपरगाव शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगाने सुरू आहे. माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले आहे. याशिवाय संवत्सर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून संवत्सरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण येथे स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.
याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, गट विकास अधिकारी स्वप्नील वाळूंज, संदीप दळवी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गिरीश गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप आदींसह एकात्म आरोग्य वर्धिनी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS