राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात

अहमदनगर/प्रतिनिधी : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरीता आवाजी मतदानाचा आम्ही जो नियमात बदल केला, तो कायद्याला धरून होता. कोणतीही घटनात्मक चूक आम्ही

दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ
राज्यपाल येता घरा…कोश्यारींच्या आजच्या दौर्‍यानिमित्त हिवरे बाजारमध्ये साफसफाई
शेतकर्‍यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा : आ.आशुतोष काळे

अहमदनगर/प्रतिनिधी : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरीता आवाजी मतदानाचा आम्ही जो नियमात बदल केला, तो कायद्याला धरून होता. कोणतीही घटनात्मक चूक आम्ही यात केली नाही, त्यामुळे राज्यपालांचा कोणत्या कारणामुळे गैरसमज झाला तो आम्हाला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आम्ही निवडणूक न घेता उलट राज्यपालांचा आदरच राखला आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. दरम्यान, नगरच्या सिव्हील हॉस्पिटल जळीत कांडाचा अहवाल जाहीर करण्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.
नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उदघाटनासाठी थोरात नगरला आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, विधानसभा अध्यक्षाचा निवडणुकीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी आम्ही काही निर्णय घेतलेले होते व ते घटनेला धरून होते. देशामध्ये जसे पंतप्रधान हे राष्ट्रपतींना या निवडीबद्दल सूचित करू शकतात तसेच राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा राज्यपालांना सूचित करू शकतात. त्यामुळे आम्ही नवीन काही केले असे नाही. जी घटनात्मक चौकट आहे, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही काहीही केलेले नाही, असेही थोरात यांनी यावेळी आवर्जून सांगितले. राज्यपाल यांना नेमका कशाबद्दलचा अपमान वाटला, हे मला समजू शकले नाही, आमचे विचारांचे मतभेद आहे, असे स्पष्ट करून थोरात म्हणाले, मात्र, आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक न घेऊन उलट राज्यपालांचा आदरच केला आहे.

कोरोना अजून आहे
अजूनही करोना गेलेला नाही. आता नवीन विषाणू म्हणजेच ओमायक्रोन हा भारतामध्ये आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचे रुग्णास सापडू लागलेले आहेत. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा अधिवेशनामध्ये दोन मंत्र्यांना, अनेक आमदारांना व पन्नास अधिकारी-कर्मचार्‍यांना करोनाची लागण झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ अजूनही हा विषाणू संपलेला नाही, तर उलट पुन्हा वर चाललेला आहे. त्यामुळे, जर आगामी काळामध्ये नियमांचे पालन केले नाही व जर रुग्णसंख्या वाढत गेली तर आपल्याला निश्‍चितपणे लॉकडाऊनसंदर्भातला विचार करावा लागेल, असेच सूचक भाष्यही मंत्री थोरात यांनी यावेळी केले. जनतेने जे काही नियम आहेत, त्या नियमांची पायमल्ली होणार नाही तसेच जी बंधने आहेत, त्यांचे तंतोतंत पालन केले पाहिजे, असे ते म्हणाले.

सिव्हिल अहवाल जाहीर करणार
नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेसंदर्भाचा अहवाल राज्य शासनाकडे प्राप्त झालेला आहे, त्यासंदर्भात लवकरच तो अहवाल कशा पद्धतीने जाहीर केला जाईल, हे पाहिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. एसटी कर्मचार्‍यांच्या संपबाबत विचारले असता, ते म्हणाले, सरकारने वेळोवेळी कर्मचार्‍यांच्या संदर्भात विषय घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती, आता संप सुरू असला तरी काहीजण कामावर हजरपण झालेले आहेत, कर्मचार्‍यांनी कामावर हजर राहिले पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचेही थोरात म्हणाले.

ती न शोभणारी गोष्ट
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वेगळ्या प्रकारचे आवाज काढले किंवा वक्तव्य केले ही न शोभणारी गोष्ट आहे. या संदर्भामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांनी याबाबत गांभीर्याने चर्चा केली आहे. आगामी काळामध्ये असे कुठे होता कामा नये याकरता सर्वांनीच नियमांचे पालन केले पाहिजे, असे थोरात म्हणाले.

COMMENTS