अकोले : तंत्र-मंत्र व अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या भोंदूगिरीप्रकरणी ३९ आमदार सामील असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यांची मागणी मार्क्सवाद

अकोले : तंत्र-मंत्र व अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या भोंदूगिरीप्रकरणी ३९ आमदार सामील असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यांची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. संबंधित आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी, अशी मागणी करत या मुद्द्यावर ६ एप्रिल रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे संविधानिक पदावर कार्यरत असतात. संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची व तो समाजात रुजवण्याची जबाबदारी दिलेली आहे. मात्र काही लोकप्रतिनिधी तंत्र-मंत्र व अंधश्रद्धेला पाठबळ देत असल्याने ही जबाबदारी धोक्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा प्रकारांमुळे समाजात भोंदूगिरीला चालना मिळत असून सामान्य नागरिक त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे भोंदू बाबांसह त्यांना समर्थन देणाऱ्या लोकप्रतिनिधींवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
तसेच या प्रकरणात संबंधित भोंदू व्यक्तीशी निगडित काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून त्यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. हे व्हिडिओ तातडीने हटवावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
राज्यात वाढत चाललेल्या भोंदूगिरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सोशल मीडियावरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशा विविध मागण्या माकपने केल्या आहेत.
या सर्व मागण्यांसाठी ६ एप्रिल रोजी तालुका स्तरावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

COMMENTS