पुणे : छत्रपती शिवाजी क्रीडांगण, बालेवाडी येथे रविवारी (दि. ९ ऑगस्ट) पार पडलेल्या पाचव्या स्वातंत्र्य चषक तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत कु. आज्ञा

पुणे : छत्रपती शिवाजी क्रीडांगण, बालेवाडी येथे रविवारी (दि. ९ ऑगस्ट) पार पडलेल्या पाचव्या स्वातंत्र्य चषक तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत कु. आज्ञा संदीप साळवी हिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकवले. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतींमध्ये तिने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत आपल्या खेळातील कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीची छाप पाडली.
सुरवातीपासूनच आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या आज्ञाने प्रत्येक सामन्यात आक्रमकता आणि संयम यांचा योग्य समन्वय साधला. प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जात तिने गुणांची प्रभावी कमाई केली. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि खेळातील बारकावे आत्मसात करण्याची तिची तयारी यामुळे तिला या स्पर्धेत यश मिळवता आले.
तायक्वांदो या क्रीडा प्रकारात पाय आणि मुठीच्या प्रहारांसोबतच चपळाई, अचूकता, शारीरिक क्षमता आणि मानसिक कणखरता यांना विशेष महत्त्व असते. या सर्व बाबींचा उत्तम प्रत्यय आज्ञाच्या खेळातून पाहायला मिळाला. तिच्या या कामगिरीमुळे कुंभार समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आज्ञाच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच तिची अथक मेहनत महत्त्वाची ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही सरावात सातत्य राखत तिने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. तिच्या कांस्यपदकाच्या कामगिरीमुळे कुंभार समाजातील विद्यार्थ्यांसह नवोदित खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाली आहे. खेळाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द असलेल्या तरुणांसाठी आज्ञाची कामगिरी आदर्श ठरणारी आहे.
कुंभार समाजाची ही धाडसी कन्या भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कर्तृत्वाची यशस्वी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कु. आज्ञा संदीप साळवी याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, पुढील क्रीडा वाटचालीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS