Homeताज्या बातम्या

राजधानीत मराठी चित्रपट महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली : राजधानीतील रसिकांना मराठी चित्रपटांच्या समृद्ध परंपरेचा परिचय करून देणाऱ्या 'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा'ची उत्स्फूर्त प्रतिसादात

पुणे-नाशिक महामार्गावर वाकीजवळ भीषण अपघात; कंटेनर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकला, कार दाबली, सुदैवाने जीवितहानी टळली!
स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश 
दिल्लीतील आंदोलनाला श्रीगोंद्यातून ‘आप’चा पाठिंबा; अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली : राजधानीतील रसिकांना मराठी चित्रपटांच्या समृद्ध परंपरेचा परिचय करून देणाऱ्या ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’ची उत्स्फूर्त प्रतिसादात दिमाखदार सांगता झाली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित तीन दिवशीय महोत्सवाला दिल्लीतील मराठी नागरिकांसह इतर भाषिक रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवातील विविध चित्रपट आणि उपक्रमांना रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मराठी चित्रपटांप्रति असलेली आपली आवड दाखवून दिली.

समारोपप्रसंगी दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आणि या महोत्सवाचे प्रमुख आयोजक वैभव डांगे यांनी महोत्सवाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. या महोत्सवासाठी आलेल्या कलाकार आणि दिग्दर्शकांनी रसिकांशी थेट संवाद साधत चित्रपटांच्या निर्मितीमागील अनुभव, विचार आणि भूमिका मांडल्या. दिल्लीतील मराठी नागरिकांसोबतच इतर भाषिक रसिकांनी दिलेला प्रतिसाद ही महोत्सवाची मोठी जमेची बाजू असून, हा केवळ प्रारंभ आहे. आगामी काळात महोत्सव अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल, असा निर्धार श्री. डांगे यांनी व्यक्त केला.

तीन दिवसांत “देऊळ बंद २”, “सत्यशोधक”, “उत्तर”, “तुंबाडची मंजुळा”, “स्थळ”, “घबाडकुंड”, “फूलवंती”, “सामना” आणि “आशा” यांसह विविध दर्जेदार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन झाले. “परत ४१ओ च्या मागावर”, “वॉटरमॅन” आणि “ग्लो वॉर्म इन जंगल” या लघुपटांनाही रसिकांचा प्रतिसाद मिळाला. सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक वारसा आणि बदलत्या समाजजीवनाचे विविध पैलू मांडणाऱ्या या कलाकृतींनी रसिकांना विचार करायला भाग पाडले.

चित्रपट प्रदर्शनासोबतच आयोजित संवाद सत्रे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे, “सत्यशोधक”चे दिग्दर्शक निलेश जलमकर, “तुंबाडची मंजुळा”चे क्रिएटिव्ह प्रोड्युसर गणेश सपकाळ, “घबाडकुंड”चे कलाकार संदीप पाठक, “मामाच्या गावाला जाऊया”चे कलाकार अभिजीत चव्हाण, “गांधी टॉक्स”च्या कलाकार उषा नाडकर्णी आणि दिग्दर्शक किशोर बेलेकर यांनी रसिकांशी संवाद साधला. चित्रपट निर्मिती, व्यक्तिरेखा, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबींवर कलाकारांनी आपले अनुभव मांडले. रसिकांनीही थेट प्रश्न विचारत संवाद साधल्याने महोत्सवाला अधिक जिवंत स्वरूप प्राप्त झाले.

महोत्सवातील “फिल्म मास्टर क्लास”लाही विशेष प्रतिसाद मिळाला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. डॉ. मिलिंद दामले यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि चित्रपट रसग्रहणाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. शंभराहून अधिक तरुण-तरुणींनी यात सहभाग घेतला. नवोदित कलाकार, विद्यार्थी आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरला.

COMMENTS