Homeताज्या बातम्या

सहकारातील संत : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील

 अहिल्यानगर जिल्ह्यात विसाव्या शतकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात जे ग्रामीण नेतृत्व उदयाला आले त्यामध्ये एकेकाळचे अहिल्यानगर ज

भाडेवाढीविरोधात व्यापाऱ्यांचे देवळाली प्रवरा नगरपालिकेस निवेदन
पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉ. मंडलिक
‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!

 अहिल्यानगर जिल्ह्यात विसाव्या शतकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात जे ग्रामीण नेतृत्व उदयाला आले त्यामध्ये एकेकाळचे अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते, शेवगाव-नेवासा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते स्व. मारूतरावजी घुले पाटील हे अग्रभागी होते. त्यांनी या भागात हरितक्रांती घडवून आणली. समाजाला नवी दिशा दिली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर इतिहास अभ्यासायचा झाला तर लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील यांचे योगदान समजून घेणे अपरिहार्य ठरते.त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. उपजतच त्यांना समाजकार्याची आवड होती श्रीरामपूर येथे शिक्षण घेत असताना शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी ते मित्रांच्या सहाय्याने धान्याची व पैशाची मदत गोळा करत .तो काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत स्वातंत्र्यलढा समजावून घेतला. प्रभात फेरी सारख्या उपक्रमात भाग घेतला. त्यांनी दहिगावच्या पाटीलकीची सूत्रे हाती घेतली तेव्हा. या काळात हैदराबाद सरकारच्या सीमेवरून रझाकांरांचा त्रास शेतकऱ्यांना होत होता तो त्रास कमी करण्यासाठी त्यांनी गावातील युवकांना एकत्र करून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुण रझाकारांचा मुकाबला केला. तो काळ सावकारशाहीचा होता. गोरगरीब जनता सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडलेली होती. अनेकांच्या जमीनी सावकर कवडीमोलाने गिळंकृत करत होते. अशा परिस्थितीत त्यांनी जिल्हा सहकारी बँकेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेमार्फत कर्ज पुरवठा सुलभ व्हावा म्हणून गावोगाव सहकारी सोसायट्या स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळावी व शेतकऱ्यांना योग्य किमतीत खते व अवजारे उपलब्ध व्हावीत म्हणून शेवगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ या संस्था दीर्घकाळ चालविल्या. कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेवगाव येथे जिनिंग प्रेसिंग मिल ची स्थापना केली.लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्यावर म.फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव होता. खेड्यापाड्यात कर्मवीर भाऊराव पाटलांचे चाललेले शैक्षणिक कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. आपल्याही परिसरातील शेतकरी, कष्टकरी, दलित, समाजाची   मुले- मुली शिकले पाहिजे या हेतूने त्यांनी १९५९साली दहिगाव-ने येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून नवजीवन विद्यालय सुरू केले. वसतिगृह सुरू करून परिसरातील गोरगरीब मुलांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली व परिसरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.                                                                             १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची सूत्रे हातात घेतली आणि महाराष्ट्र प्रगतिपथावर नेण्यासाठी महाराष्ट्रात अनेक अनुयायी त्यांनी तयार केले त्यात लोकनेते मारुतराव घुले पाटील हे अहिल्यानगर जिल्ह्यातून अग्रभागी होते. १० वर्षे त्यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत केली. त्यांचे संघटन पाहून यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ साली त्यांना शेवगाव- नेवासा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. ते प्रचंड मतांनी निवडून आले. तर १९६७ सालीही ते विधान सभेत निवडून गेले. विधानसभेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. १९६५ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे भव्य शिबिराचे नियोजन व संयोजन त्यांनी कुशलतने केले.जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शेवगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. तर शेवगाव- नेवासा भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून नेवासा येथे ज्ञानेश्वर महाविद्यालयाची भेंडा येथे जिजामाता महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, वसतिगृह, आयटीआय, खेडयापाडयात माध्यमिक विद्यालये स्थापन करुन शिक्षणाचा प्रसार केला.शेवगाव-नेवासा परिसरात शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत १९७३ साली केंद्रशासनाकडून परवानगी मिळवत भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. १२५० में. टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना १९७५ पासून सुरू झाला आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. १२५० प्रतिदिनी गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्याचे त्यांनी २००१ पर्यंत ५००० मे.टन प्रतिदिनी विस्तारीकरण केले.त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. १९९५ मध्ये त्यांना इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार, १९९६ साली भारतीय उद्योगरत्न पुरस्कार, १९९७ मध्ये सहकार भूषण पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त झाले. तर ज्ञानेश्वर साखर कारखान्यास उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाची उमेदवारी रद्द करून अल्पसंख्याक समाजातील पांडुरंग अभंग यांना उमेदवारी देऊन विधानसभेवर निवडून दिले. समाजकार्यात कार्यरत असतानाच त्यांचे ८ जुलै २००२ रोजी निधन झाले; परंतु त्यांनी दिलेला विचार केलेली कामे चिरंतन असून अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी शेवगाव-नेवासा भागाचे दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले असून त्यांच्या कार्यावर आपल्या कर्तृत्वाने कळस चढवला आहे. तर शेवगाव-पाथर्डी मतदार संघात त्यांचे दुसरे चिरंजीव माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी प्रतिनिधत्व करुन मतदारसंघात सर्वाधिक विकासनिधी आणून नेत्रदीपक कार्याचा ठसा अल्पावधित जनतेत उमठवला. नातू डॉ. क्षितिज घुले पाटील शेवगाव पंचायत समितीचे सभापती व स्नुषा राजश्री घुले पाटील अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना तालुक्यात व जिल्ह्यात नेत्रदीपक विकास कामे केली आहेत.एक कर्तृत्वसंपन्न, कामाचा मोठा आवाका असणारे सुसंस्कृत, चरित्रसंपन्न, जिद्दी व लढवू घुले पाटील कुटुंबिय आज लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे नवनिर्मितीचे अधुरे स्वप्न साकार करत आहेत हेच येथील जनतेचे भाग्य आहे. लोकनेते मारूतरावजी घुले पाटील यांचे आज पुण्यस्मरण. या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !

शब्दांकन – भाऊसाहेब सावंत

संकलन – बाळासाहेब आरगडे

COMMENTS