मुंबई : राज्यातील एका प्रभावशाली नेत्याची व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाशी भेट घेतल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आम

मुंबई : राज्यातील एका प्रभावशाली नेत्याची व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाशी भेट घेतल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी केला असून, या भेटीची सखोल चौकशीची मागणी केली आहे.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील एका समारंभातून परत येताना महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने खासगी विमानसेवेचा वापर केला. विमानतळावरील खासगी टर्मिनलवर त्या नेत्याची संबंधित विमान कंपनीच्या मालकाशी भेट झाली. या भेटीत हस्तांदोलनासह काही कागदपत्रांची देवाणघेवाण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या विमानाचा वैमानिक म्हणून पूर्वीच्या अपघातात मृत्यू झालेल्या वैमानिकाचा मुलगा कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हा अपघात होता की नियोजित घातपात, याबाबत राज्यात विविध तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी नव्या दाव्यांमुळे या प्रकरणातील संशय अधिकच गडद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी इशारा देत सांगितले की, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नये, संबंधित व्यक्तींना संरक्षण देण्याचा प्रयत्न टाळावा आणि अशा विमानसेवेचा वापर करताना खबरदारी घ्यावी. अन्यथा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, ही व्यक्ती यापूर्वी आंध्र प्रदेशात काही मोठ्या प्रकल्पांमध्ये मध्यस्थ म्हणून कार्यरत होती. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातही विविध प्रकल्पांमध्ये मध्यस्थ किंवा दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची माहिती पुढे येत आहे. या दाव्यांमुळे शासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले
स्वतंत्र चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणात अद्याप अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इतक्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आणि सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS