जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला वेग आला असतानाच, आता ‘53 प्लस’ या निकषावरून सेवाजेष्ठ शिक्षकांना समायोजन यादीबा

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला वेग आला असतानाच, आता ‘53 प्लस’ या निकषावरून सेवाजेष्ठ शिक्षकांना समायोजन यादीबाहेर ठेवण्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, 2011 च्या शासन निर्णयात अशा प्रकारे शिक्षकांना वगळण्याची स्पष्ट तरतूद नसल्याचा दावा अन्यायग्रस्त शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 7 मे 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार, सन 2025-26 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांचे प्रथम तालुकास्तरावर समायोजन करून उर्वरित शिक्षकांना जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी कार्यमुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अनेक तालुक्यांमध्ये सेवाजेष्ठ शिक्षकांची नावे ‘53 प्लस’ या कारणावरून समायोजन यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. शिक्षक संघटनांच्या मते, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या 12 व 18 मे 2011 च्या शासन निर्णयात ‘53 प्लस’ शिक्षकांना समायोजनातून सूट देण्याचा कुठेही उल्लेख नाही. उलट, सेवानिवृत्तीस पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी उरलेला असल्यास संबंधित शिक्षकांच्या विनंतीनुसार त्याच तालुक्यात प्राधान्याने समायोजन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे समायोजनातून पूर्णतः वगळणे हा निर्णय कोणत्या नियमाच्या आधारे घेतला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वीच्या समायोजन प्रक्रियेत अनेक ‘53 प्लस’ शिक्षकांचे समायोजन झाल्याची उदाहरणेही शिक्षकांनी पुढे आणली आहेत. समायोजन यादीतील अनेक सेवाजेष्ठ शिक्षक हे विविध शिक्षक संघटनांशी संबंधित किंवा नेतृत्वाच्या भूमिकेत असल्याने, दबावातून त्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचीही चर्चा शिक्षण वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्याय झाल्याचा दावा करणार्या शिक्षकांचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. समायोजन प्रक्रिया तात्काळ स्थगित करून यादी नव्याने तयार करावी, अशी मागणीही शिक्षकांकडून होत आहे. मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होनवडज येथील सहशिक्षक शशिकांत राजेंद्र करकेलवार यांनी गटशिक्षणाधिकार्यांकडे दिलेल्या निवेदनात गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. पूर्वीच्या आणि सध्याच्या समायोजन यादीत मोठे बदल झाल्याचा दावा करत, सेवाजेष्ठ शिक्षकांना वगळून सेवा कनिष्ठ शिक्षकांना समायोजनात स्थान देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ‘53 प्लस’ शिक्षकांना नेमक्या कोणत्या आदेशानुसार सूट देण्यात आली, याचा खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.
नियम एक, अंमलबजावणी दुसरी?
शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. शासन निर्णय एक सांगतो आणि स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी दुसरीच होत आहे का? त्यामुळे समायोजन प्रक्रियेत एकसमान निकष लागू करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

COMMENTS