Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी नवे समीकरण?खतगावकरांकडून अशोकराव चव्हाणांविषयी गौरवोद्गार

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्य

प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांचा उपरोधिक सवाल; नगरसेवक अ‍ॅड. महेश कनकदंडे यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, नेटवर्क नाही की नेतेच नाहीत?
कोट्यवधींची ‘केमिकल’ डागडुजी फेल; जिल्हा परिषद इमारत मृत्यूच्या उंबरठ्यावर!भेगांनी पोखरलेल्या इमारतीत कर्मचारी कामावर; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप
प्रि-बार्गेनिंगद्वारे पहिला ऐतिहासिक निकाल

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राजकीयदृष्ट्या दूर गेलेले बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याविषयी केलेल्या सकारात्मक वक्तव्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीत नवे राजकीय समीकरण आकार घेत असल्याची चर्चा रंगली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना खतगावकर यांनी बँकेच्या कठीण आर्थिक परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांनी महत्त्वाची मदत केल्याचे सांगितले. त्यांच्या निर्णयांमुळे बँकेला मोठा दिलासा मिळाला आणि आज बँक स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली असून पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सहकार विभागाने सुरू केली आहे. अशा संवेदनशील टप्प्यावर खतगावकर यांनी चव्हाणांविषयी व्यक्त केलेली भूमिका राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. अनेक वर्षे स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर आता ते पुन्हा जुन्या सहकार्यांकडे झुकत असल्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. यावेळी बँकेच्या आर्थिक कामगिरीची माहिती देताना खतगावकर म्हणाले की, मागील आर्थिक वर्षात बँकेला 53 कोटी 75 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. विविध तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा 7 कोटी 32 लाख रुपये इतका राहिला. दहा वर्षांपूर्वी लोकनियुक्त संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली कारभार हाती घेतल्यानंतर शासनाकडील थकहमीची 25 कोटींची रक्कम आणि इतर संस्थांकडील थकीत देणी वसूल करण्यात यश आले. त्यामुळे बँकेवरील संचित तोटा पूर्णतः भरून निघाला असून बँक आता तोटामुक्त झाल्याचा दावा त्यांनी केला. बँकेच्या एकूण 63 शाखांपैकी 58 शाखा नफ्यात कार्यरत असून केवळ 5 शाखा तोट्यात आहेत. त्या शाखांनाही लवकरच नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम आणि इतर संचालक उपस्थित होते. दरम्यान, नोकरभरती प्रकरणावरही खतगावकर यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, भरती प्रक्रियेसाठी तीन एजन्सीकडून कोटेशन मागविण्यात आले होते; मात्र कोणत्याही कंपनीला परीक्षा घेण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले नव्हते. माध्यमांत आलेल्या बातम्यांनंतर शासनाने प्रक्रिया स्थगित केली. त्यामुळे भरती रद्द होण्यामागे कोणत्याही एका नेत्याचा दबाव नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय फेरबदलांच्या शक्यतेविषयी विचारले असता खतगावकर यांनी सावध भूमिका घेत, मी सध्या सक्रिय राजकारणात नाही, असे सांगितले. मात्र त्याच वेळी चव्हाणांविषयी केलेले कौतुक आणि बँकेच्या निवडणुकीची चाहूल पाहता, नांदेडच्या राजकारणात आगामी काळात काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

COMMENTS