श्रीगोंदा : तालुक्यातील घोडेगाव येथील माजी सरपंच रूपचंद दरेकर यांच्या मुलाच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोम

श्रीगोंदा : तालुक्यातील घोडेगाव येथील माजी सरपंच रूपचंद दरेकर यांच्या मुलाच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २२ जून) दुपारी घडली. या घटनेत अभिषेक रूपचंद दरेकर (वय २२ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण घोडेगाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक दरेकर हे कोल्हापूर येथे अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शिक्षण घेत होते. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने ते काही दिवसांसाठी आपल्या मूळ गावी घोडेगाव येथे आले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास परिसरात पावसाची जोरदार हजेरी लागली होती. दरम्यान, वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी अभिषेक ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते.
याच वेळी अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि दुर्दैवाने अभिषेक यांच्या अंगावर वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, वीज कोसळल्याने बसलेल्या तीव्र धक्क्यामुळे अभिषेक यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरेकर कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील अनेक नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी पावसाच्या वेळी उघड्या मैदानात, शेतात किंवा झाडाखाली थांबणे टाळावे, तसेच हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान तरुणाच्या मृत्यूने पूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

COMMENTS