मराठा समाजातील पहिली मुलगी पोलीस दलात दाखल किल्लेधारूर : धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील कु. ज्योती दत्ता अंडील हिची मुंबई शहर पोलीस दलात

मराठा समाजातील पहिली मुलगी पोलीस दलात दाखल
किल्लेधारूर : धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील कु. ज्योती दत्ता अंडील हिची मुंबई शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पहाडी पारगाव येथील शेतकरी कुटुंबातील आणि सध्या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या दत्ता अर्जुनराव अंडील यांची कनिष्ठ कन्या कु. ज्योती अंडील हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मुंबई शहर पोलीस दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. पहाडी पारगाव येथील मराठा समाजातून पोलीस सेवेत निवड होणारी पहिली मुलगी म्हणून ज्योती अंडील हिला विशेष मान मिळाला आहे.
या यशाबद्दल गावातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ज्योती अंडील यांच्यासह तिचे आई-वडील, आजी-आजोबा आणि कुटुंबियांचा शाल, हार व फेटा परिधान करून सत्कार करण्यात आला. तिच्या मामाचे गाव असलेल्या धुनकवाड येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत धुणकेश्वराची प्रतिमा भेट देऊन तिचा गौरव केला, तर मैंदा ग्रामस्थांच्या वतीनेही तिचे अभिनंदन करण्यात आले.
या सोहळ्याला सरपंच पती बालासाहेब अंडील, आसारामजी मुंडे (चेअरमन, सेवा सहकारी सोसायटी), बंडूभाऊ मस्के (माजी सरपंच), भागवतजी गव्हाणे (सरपंच, धुनकवाड), पत्रकार जगदीश गोरे (तालुकाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया), सेवानिवृत्त प्राचार्य महादेव अंडील, पोलीस पाटील नारायण मंत्रे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य महादेव अंडील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. जी. पी. अंडील यांनी केले तर आभार अशोक अंडील यांनी मानले.

COMMENTS