अकोले : शाळेतील मैत्री ही केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभर जपण्याचा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा आदर्श समशे

अकोले : शाळेतील मैत्री ही केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभर जपण्याचा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा आदर्श समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयाच्या १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे. ‘ऋणानुबंध मैत्री बचत गट’ स्थापन करून या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मित्रपरिवारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.या उपक्रमांतर्गत वर्गमित्रांनी दरमहा प्रत्येकी ५०० रुपयांची बचत करण्याचा संकल्प केला आहे. या निधीतून ग्रुपमधील सदस्यांच्या मुला-मुलींचे विवाह, वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जात आहे. सामूहिक बचतीतून उभारलेला हा निधी आजच्या महागाईच्या काळात मित्रांसाठी मोठा आधार ठरत आहे.नुकतेच या गटाकडून दुसरे ‘कन्यादान’ पार पडले. वर्गमित्र राहुल बेनके यांच्या मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या विवाहानिमित्त गटाच्या वतीने ३० हजार रुपयांची मदत देण्यात आली. “मित्राच्या मुलीचे लग्न म्हणजे आपल्या घरचेच कार्य” या भावनेतून सर्व सदस्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या गटात अध्यक्ष रामदास बेनके, उपाध्यक्ष श्रीकांत उघडे, सचिव राम कोतवाल यांच्यासह अमजद शेख, आशिष तळेकर, नंदू मंडलिक, भिवा सदगीर, अरुण बेनके, विलास दराडे, दीपक जगताप, रामचंद्र मेंगाळ, किसन मोखरे, बंडू सदगीर, संतोष भालेराव, सुबोध भोसले, खंडू ढोन्नर, तुकाराम मोखरे, बहिरु सदगीर, संपत सहाणे, देवराम घोडसरे, निवृत्ती ढोन्नर, संतोष मंडलिक, जमील शेख, मधुकर बेनके, दीपक शिंदे, धोंडीराम बेनके आदींचा सहभाग आहे.

COMMENTS