Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये निळा महासागर उसळला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर अक्षरशः निळ्या महासागराने भरून गेले. महापालिकेच्या वतीने सकाळी रेल्

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेडमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम
डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे
बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर अक्षरशः निळ्या महासागराने भरून गेले. महापालिकेच्या वतीने सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम पार पडला, तर शहरभर भव्य मिरवणुका, घोषणाबाजी आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात महापौर कविता मुळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही अभिवादन करून बाबासाहेबांच्या कार्याला नमन केले. अभिवादनानंतर भदंतांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशरण, पंचशील आणि आष्टगाथेचे सामूहिक पठण करण्यात आले. वातावरणात एकाच वेळी श्रद्धा, विचार आणि ऊर्जा यांचा संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या समाजाला असलेली गरज अधोरेखित केली. सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभ्या असलेल्या भारतीय संविधानाची जपणूक करण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरातील विविध भागांतून निघालेल्या मिरवणुकांनी नांदेडचे रस्ते निळ्या रंगात न्हाऊन निघाले. हातात निळे झेंडे, अंगावर निळे फेटे आणि टी-शर्ट घातलेले हजारो आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते. जय भीम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. मिरवणुकांमध्ये तरुणाईचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. अनेक ठिकाणी डीजेच्या ठेक्यावरही जल्लोष झाला, तर काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने शिस्तबद्ध मिरवणुका काढण्यात आल्या. महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, ज्यांनी उत्साहात सहभाग घेत जयंतीला वेगळी उंची दिली. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वत्र निळ्या झेंड्यांची पताका फडकत होती. जणू संपूर्ण नांदेडच बाबासाहेबांच्या विचारांनी भारावून गेले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर अभिमान, कृतज्ञता आणि प्रेरणेची झलक स्पष्ट दिसत होती. या कार्यक्रमास उपमहापौर दिपकसिंग रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाड़ीवाले, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, गटनेता प्रशांत इंगोले, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. एकूणच, नांदेडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उसळलेल्या निळ्या महासागराने सामाजिक एकात्मता, विचारांची ताकद आणि जनतेच्या भावनांचा प्रचंड आविष्कार घडवून आणला.

COMMENTS