Homeताज्या बातम्या

कारगिल विजय हा इतिहासातील महत्त्वाचा दिवस; माजी सैनिक समितीसाठी कारखान्याकडून ४२ गुंठे जागा: बाळासाहेब थोरात

संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये सैनिकांनी मोठे योगदान दिले आहे. देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सै

नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू चोरून नेणारा ट्रॅक्टर जप्त; सिंदखेड पोलिसांची धडक कारवाई, ४.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
इराणवर अमेरिकेचे अकराव्या दिवशीही हल्ले सुरूच; लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांवर जोरदार कारवाई
राहाता ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव; रुग्णांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये सैनिकांनी मोठे योगदान दिले आहे. देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांचे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनामध्ये मोठे आदराचे स्थान आहे. ते रात्रंदिवस सीमेवर खंबीरपणे उभे आहेत म्हणूनच देशातील नागरिक शांततेची झोप घेऊ शकतात. पाकिस्तानच्या कुरापतींविरुद्ध लढून भारतीय जवानांनी कारगिलमध्ये मिळवलेला विजय हा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्ण दिवस आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेरमध्ये माजी सैनिकांसाठी व स्वातंत्र्य सैनिकांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेल्हाळे परिसरात ४२ गुंठे जागा दिली जाणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मालपाणी लॉन्स येथे स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित वीरमाता, वीरपत्नी व समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रा. बाबा खरात यांच्यासह स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी थोरात म्हणाले की, या ४२ गुंठे जागेत राज्यातील सर्वोत्तम व सुंदर असे स्मारक उभारले जावे. तसेच ही समिती वीरमाता व वीरपत्नींसाठी जे कार्य करत आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी भारतीय सैन्याचे योगदान अमूल्य आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणाऱ्या समितीला कारखान्याने ४२ गुंठे जागा उपलब्ध करून देणे हा अत्यंत अभिनंदनीय निर्णय आहे. यावेळी भानुदास पोखरकर, प्रा. बाबा खरात आणि सुभाष कुडेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कोटकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र जोशी यांनी केले, तर आभार सुनील थोरात यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील सैनिकांचे कुटुंबीय, नागरिक, महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालपाणी लॉन्स अशी भव्य रॅली काढली, ज्यामध्ये ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जवान जय किसान’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

COMMENTS