देवळाली प्रवरा: वाळूज परिसरातील गावठी शस्त्र विक्री प्रकरणाचा सखोल तपास करताना वाळूज पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा प्रम

देवळाली प्रवरा: वाळूज परिसरातील गावठी शस्त्र विक्री प्रकरणाचा सखोल तपास करताना वाळूज पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा प्रमुख सचिन घोरपडे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या आता सातवर पोहोचली आहे.
यापूर्वी या गुन्ह्यात राहुल गायकवाड, सिद्धांत धनेधर आणि शाहरूख सांडू सय्यद यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तपासादरम्यान सचिन घोरपडे हाच या शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. घोरपडे याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात याआधीही सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
शस्त्र विक्री करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी वाळूज पोलिसांनी अत्यंत चिकाटीने तपास केला. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक फौजदार सुखदेव भागडे तसेच पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुखदेव कोल्हे आणि विजय त्रिभुवन यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
काय आहे नेमके प्रकरण?
सोमवारी (दि. २० जुलै) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाळूजजवळील जिकठाण गाव परिसरात संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एका कारवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या कारवाईत राहुल धर्मराज गायकवाड (वय २५, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि सिद्धांत शिवाजी धनेधर (वय २६, रा. रमानगर, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी कार जप्त करून सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर फरार असलेला शाहरूख सांडू सय्यद (वय २६, रा. बेलापूर चांदनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यालाही बेड्या ठोकल्या. आता टोळीप्रमुख सचिन घोरपडे याला अटक झाल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या सात झाली असून वाळूज पोलीस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS