देगलूर: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना-२०२६ अंतर्गत देगलूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय उद्योजकता व पशुपालन प्रशिक्षण कार्यक

देगलूर: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना-२०२६ अंतर्गत देगलूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय उद्योजकता व पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ झाला. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५५० लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवत आधुनिक पशुपालन, उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शक धडे घेतले.
तालुका पशुवैद्यकीय दवाखाना, देगलूर येथे दि. २३ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रतिककुमार धुळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अरविंद गायकवाड होते. यावेळी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. सखाराम खुणे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीरचे प्रा. डॉ. जी. आर. पगारे, डॉ. व्ही. बी. डोंगरे, डॉ. पी. के. पाटील, पशुधन पर्यवेक्षक गौतम खिल्लारे, रविकुमार सुरेवाड तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी सुरेश पाशमवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणामध्ये आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, पशू आरोग्य व्यवस्थापन, संतुलित आहार, आर्थिक नियोजन, शासकीय योजनांचा प्रभावी लाभ, उद्योजकता विकास तसेच पशुपालन व्यवसायातून स्वयंरोजगाराच्या विविध संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. तज्ज्ञांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसनही केले.
यावेळी अधिकार्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकर्यांना पशुपालन क्षेत्रात सक्षम उद्योजक म्हणून घडविणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. या प्रशिक्षणातून लाभार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पशुपालन व्यवसाय अधिक नफ्याचा व वैज्ञानिक पद्धतीने करू शकतील. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासोबतच पशुपालन क्षेत्रालाही नवी चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

COMMENTS