मुंबई: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित प्रश्नपत्रिका गैरप्रकाराच्या निषेधार्थ देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस

मुंबई: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित प्रश्नपत्रिका गैरप्रकाराच्या निषेधार्थ देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. २४ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण मुंबईत जमावबंदी लागू राहणार असून, परवानगीशिवाय मोर्चा, आंदोलन किंवा मोठ्या प्रमाणावर जमाव जमवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सार्वजनिक शांतता राखणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. अलीकडेच दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मुंबईतील विविध भागांत निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर शहरातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर जमाव, मोर्चा किंवा आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे.
प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, स्फोटके किंवा इतर धोकादायक वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे, ध्वनिवरिक्षकाद्वारे गाणी वाजवणे, भाषणे देणे, फलक, बॅनर, चिन्हे किंवा इतर प्रतीकात्मक साहित्याचे प्रदर्शन करणे यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता, सुरक्षितता किंवा सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी राहील.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आवश्यक परवानगी न घेता मोर्चा किंवा आंदोलन आयोजित केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. बेकायदेशीर जमाव जमवणे किंवा प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत झालेल्या निदर्शनांनंतर पोलिसांनी सुमारे ९०० आंदोलकांविरुद्ध आठ गुन्हे नोंदवले होते. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

COMMENTS