गँगटॉक: सिक्किमच्या नामची जिल्ह्यातील झोलुंगे परिसरातील समरडाँग येथे उभारण्यात येत असलेल्या तीस्ता टप्पा-६ जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान

गँगटॉक: सिक्किमच्या नामची जिल्ह्यातील झोलुंगे परिसरातील समरडाँग येथे उभारण्यात येत असलेल्या तीस्ता टप्पा-६ जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बोगद्यात अजूनही काही कामगार अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांचा शोध घेण्यासाठी रात्रभर बचावमोहीम सुरू होती. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने मदतकार्य अधिक वेगाने सुरू केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास बोगद्यामध्ये काम सुरू असताना अचानक मोठा स्फोटासारखा आवाज झाला. त्यानंतर बोगद्यात विषारी वायू गळती झाल्याचा संशय निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच कामगारांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही कामगार सुरक्षित बाहेर येण्यात यशस्वी झाले; मात्र अनेक जण आतमध्येच अडकून पडले.
दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र बोगद्यातील विषारी वायू, अंधार, अरुंद मार्ग आणि प्रतिकूल वातावरणामुळे सुरुवातीच्या बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आवश्यक विशेष उपकरणे घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावमोहिमेला गती मिळाली.
यानंतर पाक्योंग आणि सिलिगुडी येथून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) विशेष पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), पोलीस, अग्निशामक दल, आरोग्य विभाग तसेच इतर यंत्रणांनी संयुक्तरीत्या शोध व बचावकार्य हाती घेतले. रात्रभर सुरू असलेल्या या मोहिमेत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवण्यात आले असून मंगळवारी पहाटे मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मृतांची संख्या वाढून आठ झाली आहे.

COMMENTS