बीड: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेअंतर्गत बीज भांडवल कर्जाचा लाभ घेतलेल्या महिला बचत गटातील सभासदांसाठी आयोजित तीन

बीड: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेअंतर्गत बीज भांडवल कर्जाचा लाभ घेतलेल्या महिला बचत गटातील सभासदांसाठी आयोजित तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप झाला. या कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रेमलता पारवे व महिला व बाल कल्याण सभापती आरती रणजित बनसोडे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी महिलांच्या या पुढाकाराचे कौतुक केले असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी नगरपरिषद प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली.
राज्यस्तरीय तांत्रिक संस्था तथा कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पीएमएफएमई योजनेअंतर्गत महिला बचत गटातील सदस्यांना स्वतःचा अन्नप्रक्रिया व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या लाभार्थी महिलांना उद्योग व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, विपणन (मार्केटिंग), गुणवत्ता नियंत्रण आणि व्यवसाय कौशल्याबाबत परिपूर्ण प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. याच अनुषंगाने बीड नगरपरिषद सभागृहात दि. १५ जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाबाबत माहिती देताना सभापती आरती रणजित बनसोडे यांनी सांगितले की, या तीन दिवसांच्या प्रशिक्षणामुळे महिला बचत गटातील सदस्यांना अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी आवश्यक तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्य आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ कसा घ्यावा याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतील आणि शहर व ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळेल.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बचत गटांतील सर्व सभासदांची पूर्ण उपस्थिती नोंदवण्यात आली असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा अनुपालन अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येणार आहे. आमदार विजयसिंह पंडित तसेच उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

COMMENTS