नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी'ने पुकारलेल्या आंदोलनानंतर नवी दिल्लीतील राजकीय वा

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पुकारलेल्या आंदोलनानंतर नवी दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. काल जंतर मंतर ते संसद भवन दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. आज सकाळी संसद परिसरापासून आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस खासदारांनी जंतरमंतरकडे जाण्यापूर्वी पंतप्रधान निवासासमोर धरणे आंदोलन धरले. या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेदेखील सहभागी झाले होते.
यावेळी काँग्रेस खासदारांनी “मोदींची हुकुमशाही चालणार नाही”, “मोदी हाय हाय”, “अमित शाह हाय हाय” आणि “जेव्हा जेव्हा मोदी घाबरतात, पोलिसांना पुढे करतात” अशा जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे सर्व खासदार आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी जंतर मंतरवर दाखल झाले आहेत.
‘विद्यार्थ्यांना झालेली मारहाण निंदनीय; मोदींनी माफी मागितलेली नाही’ – राहुल गांधी
संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. “हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे या विषयावर तात्काळ चर्चेची मागणी केली होती. मात्र चर्चेसाठी अध्यक्षांना सरकारची परवानगी लागते, यावरूनच सगळं स्पष्ट होतं. विद्यार्थ्यांना झालेली मारहाण अत्यंत निंदनीय असून, काल घडलेल्या प्रकारावर पंतप्रधान मोदींनी अद्याप साधी माफीही मागितलेली नाही,” असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

COMMENTS