नांदेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे ख

नांदेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात नांदेडमध्ये अत्यंत आक्रमक आंदोलन छेडले. नांदेड विमानतळाबाहेर तसेच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव पाटीजवळ खासदारांच्या ताफ्याला अडवत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
विमानतळाबाहेर राडा; खासदाराला गाडी फिरवावी लागली
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही खासदार एकाच विमानाने नांदेड विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्ते आधीच जमा झाले होते. खासदार बाहेर पडताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी आपली गाडी वळवून तेथून माघार घेतली.
पिंपळगाव पाटीजवळ पुन्हा ताफा अडवला
दरम्यान, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार बंडू जाधव हे विमानतळावरून हदगाव मतदारसंघाच्या दिशेने रवाना झाले. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ त्यांचा ताफा गाठला. ’गद्दारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी काही काळ गाड्या पुढे जाऊ दिल्या नाहीत, ज्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे अनेक प्रमुख तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्या ३९ शिवसैनिकांना ताब्यात घेत अटक केली. यामध्ये अनेक प्रमुख पदाधिकार्यांचा समावेश होता. मात्र, काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS