महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून किनवट नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर ’अटल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून किनवट नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर ’अटल आनंद घनवन योजना 2026’ अंतर्गत भव्य वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ आज, 3 जुलै रोजी करण्यात आला. ’हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या शासनाच्या ध्येयानुसार सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड यांच्या वतीने 30 आर क्षेत्रावर तब्बल 9,000 वृक्षांची लागवड करून येथे ’घनवन क्षेत्र’ विकसित केले जाणार आहे.
या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन किनवटच्या नगराध्यक्षा सुजाताताई विनोद एंड्रलवार यांच्या शुभहस्ते फलक अनावरण व वृक्षारोपण करून झाले. डम्पिंग ग्राउंडचे रूपांतर घनवनात करून शहरासाठी ’ऑक्सिजन झोन’ निर्माण करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने नगराध्यक्षा सुजाताताई एंड्रलवार, उपनगराध्यक्ष पठाण मोहम्मद हसन खान आणि उपस्थित नगरसेवकांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष पठाण मोहम्मद हसन खान, रोहनभाऊ एंड्रलवार, नगरसेवक अभय महाजन, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख तथा नगरसेवक प्रशांत कोरडे, बांधकाम सभापती राम नेम्मानिवार, पाणीपुरवठा सभापती निसार भाटी, नगरसेवक चंद्रशेखर नेम्मानिवार, नगरसेवक प्रतिनिधी प्रभू कोल्हे, किरण कलगोटवार, दत्ता कोल्हे उपस्थित होते. तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एच. संघई, वनपाल प्रकाश सूर्यवंशी, वनरक्षक सुनील खामकर, सारिका माहुरे, श्रीमती गीते यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS