शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी गावातील मुख्य नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत आहे

शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी गावातील मुख्य नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत आहे. नाल्यावर असलेला सध्याचा पूल पुराच्या पाण्याखाली जात असल्याने आरळी गाव अक्षरशः बेटाचे स्वरूप धारण करत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
आरळी हे सर्कलमधील प्रमुख गाव असून येथे सुमारे चार हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. परिसरातील अनेक गावांच्या शिवारातील पावसाचे व पुराचे पाणी या नाल्यातून वाहून येत असल्याने पावसाळ्यात नाल्याला मोठा पूर येतो. परिणामी नळकांडी पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. आरळी ते बंगला मार्गे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मात्र पूल बंद झाल्यानंतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकर्यांची शेतीची कामे, नोकरदारांचा दैनंदिन प्रवास तसेच रुग्णांची ये-जा विस्कळीत होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, उंच पुलाच्या मागणीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही प्रश्न प्रलंबितच आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. आरळीकरांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने निधी मंजूर करून उंच व भक्कम पुलाचे बांधकाम करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

COMMENTS