Homeताज्या बातम्या

विद्यापीठाच्या ध्वजातील निळा रंग हटविल्याचा आरोपपूर्ववत करण्यासाठी 11 सप्टेंबरपासून अमरण उपोषणाचा इशारा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकृत ध्वजातील निळा रंग हटविण्यात आल्याचा आरोप अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा ज्ये

डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीत अंधार; पथदिवे बंद प्रकरणी चौकशीची मागणी
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही : महापौर कविता मुळे
एका सरदारजींच्या पुढाकारातून गोदावरी स्वच्छतेचा संदेश; नांदेडकरांना एकत्र येण्याचे आवाहन



स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकृत ध्वजातील निळा रंग हटविण्यात आल्याचा आरोप अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तलवारे यांनी केला आहे. या निर्णयासाठी विद्यापीठाचे कुलपती असलेल्या राज्यपालांची परवानगी घेण्यात आलेली नाही, तसेच व्यवस्थापन परिषदेचाही कोणताही ठराव नसल्याचा दावा त्यांनी केला असून, ध्वजातील निळा रंग पूर्ववत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे.
तलवारे यांच्या म्हणण्यानुसार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन पहिले कुलगुरू दिवंगत डॉ. जनार्धन वाघमारे यांनी ’चिंतन एका कुलगुरुंचे’ या पुस्तकात विद्यापीठाच्या ध्वजातील निळ्या रंगाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. नांदेड ही श्री गुरु गोविंदसिंहजी यांची कर्मभूमी असल्याने शिखांसाठी पवित्र मानला जाणारा निळा रंग ध्वजात समाविष्ट करण्यात आला होता. तसेच दलित समाजाच्याही श्रद्धेचे प्रतीक म्हणून या रंगाचा उल्लेख करण्यात आल्याचे तलवारे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत तलवारे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने सादर केल्याचे नमूद केले. या प्रकरणाच्या अभ्यासासाठी विद्यापीठाने संतराम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली असली, तरी वर्षभर उलटूनही समितीचा अहवाल किंवा त्यावरील कार्यवाही सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ध्वजातील निळा रंग पूर्ववत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आपण येत्या 11 सप्टेंबरपासून अमरण उपोषणास बसणार असल्याची माहितीही तलवारे यांनी दिली. याबाबत प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ प्रशासनाने ध्वजातील रंगबदलाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आणि या संदर्भातील निर्णयप्रक्रिया सार्वजनिक करावी, अशी मागणीही तलवारे यांनी केली. तसेच या प्रश्नावर व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

COMMENTS