Homeताज्या बातम्या

सांगवीच्या विकासासाठी मीनल पाटील आक्रमकमहासभेत सीबीएसई शाळा, विद्युत दाहिनी, ड्रेनेज सुधारणा व ’खाऊ गल्ली’सह विकासाचा चौफेर अजेंडा; प्रशासनाला तातडीच्या निर्णयाची मागणी

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांचा मुद्दा जोरदारपणे

हद्दवाढ भागासाठी स्वतंत्र वीज वाहिनी टाकाआ. काळे यांचे महावितरणला निर्देश; अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
कामकाजात गती, स्वच्छतेत शिस्त; महापौरांचे क्षेत्रीय कार्यालयांना कडक निर्देश
प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश



नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांचा मुद्दा जोरदारपणे मांडत शिवसेनेच्या नगरसेविका मीनल गजानन पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जवळपास 27 वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या सांगवी परिसराला अद्यापही मूलभूत नागरी सुविधा, दर्जेदार शिक्षण, सक्षम मलनिस्सारण व्यवस्था, आधुनिक स्मशानभूमी आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी महासभेत आक्रमक भूमिका घेतली.
अर्थसंकल्पीय महासभा ही केवळ आर्थिक तरतुदींची प्रक्रिया न राहता नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे व्यासपीठ ठरले पाहिजे, असे सांगत त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सभागृहासमोर मांडल्या. महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतरही सांगवी परिसराच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगवी परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्यानुसार नागरी सुविधा वाढलेल्या नाहीत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक सुविधा या सर्वच क्षेत्रांत मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे विकास आराखड्याचा फेरआढावा घेऊन सांगवीसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, महापालिकेच्या माध्यमातून या भागात अद्याप एकही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा उभारण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या दोन शाळा असल्या तरी त्यांची इमारत, सुविधा आणि विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज सीबीएसई शाळा सुरू करावी, अशी त्यांनी मागणी केली. स्मशानभूमीतील अपुर्‍या सुविधांवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सांगवी येथील हिंदू स्मशानभूमीत पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा चिखल, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि पावसापासून संरक्षण नसल्याने अंत्यविधीही अडथळ्यात येतात. त्यामुळे तेथे आधुनिक विद्युत दाहिनी, प्रशस्त शेड, स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. पावसाळ्यातील ड्रेनेज समस्येचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी प्रशासनावर गंभीर टीका केली. मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्यामुळे सांडपाणी घरांमध्ये शिरते, रस्त्यांवर पाणी साचते आणि अनेक भागांत ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमधील गळतीमुळे दूषित पाणी नागरिकांच्या नळांमध्ये येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या संदर्भात 17 मार्च 2026 रोजी आयुक्तांना निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण ड्रेनेज व्यवस्थेचे रिव्हर्स सर्वेक्षण करून दोषी ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. रोजगारनिर्मितीचा मुद्दाही त्यांनी महासभेत प्रभावीपणे मांडला. चैतन्य नगर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील महापालिकेच्या उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करून तेथे ’खाऊ गल्ली’ उभारावी. या ठिकाणी महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित खाद्यसंस्कृतीचे केंद्र उपलब्ध होईल आणि महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल. याच परिसरात पोलीस चौकी व प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला. सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी नगरसेविका मीनल गजानन पाटील यांनी केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सांगवीच्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा महापालिकेच्या केंद्रस्थानी आला असून, आगामी काळात प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मीनल पाटील यांच्या चार प्रमुख मागण्या
सांगवी येथे अत्याधुनिक सीबीएसई शाळा सुरू करावी., हिंदू स्मशानभूमीत विद्युत दाहिनी व सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात., संपूर्ण ड्रेनेज व्यवस्थेचे रिव्हर्स सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी., चेतन नगर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर ’खाऊ गल्ली’, पोलीस चौकी व आरोग्य केंद्र उभारावे.
सांगवीच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष?
महापालिकेत समावेश होऊन तब्बल 27 वर्षे उलटून गेली असतानाही सांगवी परिसरात मूलभूत नागरी सुविधांची कमतरता कायम आहे. शिक्षण, रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी आणि रोजगारनिर्मिती या सर्वच क्षेत्रांत विकासाची मोठी तूट असल्याचे नगरसेविका मीनल पाटील यांनी महासभेत अधोरेखित केले. वाढत्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करून सांगवीला प्राधान्याने निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
’विकासाची आश्वासने नव्हे, प्रत्यक्ष कामे हवीत’
महासभेत मांडलेल्या मागण्यांमुळे सांगवी प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर यापूर्वी निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याने आता प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष विकासकामे सुरू करावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आगामी काळात या मागण्यांना अर्थसंकल्पात किती प्राधान्य मिळते, याकडे संपूर्ण सांगवीकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS