माऊली विद्यापीठ, केज संचलित प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे पदवीदान समारंभ तसेच माजी विद्यार्थी-पालक मेळावा अत्यंत उत्सा

माऊली विद्यापीठ, केज संचलित प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे पदवीदान समारंभ तसेच माजी विद्यार्थी-पालक मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. के. के. कलाणे यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा सादर केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देत पदवीदान समारंभाचे महत्त्व तसेच माजी विद्यार्थी व पालक यांच्याशी नाते अधिक दृढ करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमास पालक खंडेराव बारगजे, सपकाळ, अक्रूर गवळी, काकूजी भालेराव, केशव घोडके, इंगोले, चव्हाण, धपाटे, वाघमोडे गुरुजी आदी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि. प. मराठी कन्या शाळा, नेकनूरचे केंद्रप्रमुख श्री. सय्यद इद्रिस सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, सातत्य व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले. या समारंभात बी.ए. व बी.एस्सी. शाखेतील एकूण 45 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पदवी स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद व अभिमान स्पष्ट दिसून येत होता. उपस्थित पालकांनीही हा क्षण अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डी. के. ढास यांनी पदवी ही यशाची अंतिम पायरी नसून नव्या जबाबदार्यांची सुरुवात असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य, चारित्र्य व सामाजिक मूल्यांच्या जोरावर राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. माजी विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पदवीदान समितीचे समन्वयक डॉ. मुजावर एस. टी. यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. आंधळे डी. ए. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जाधव श्रीकृष्ण यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.

COMMENTS