Homeताज्या बातम्या

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला गवळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसादतहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रत्यक्ष भेट; घरपोच गणना प्रपत्र वाटप करून मतदारांना केले जागृत

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एस.आय.आर.)-2026 कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि

उर्दुघर ला मिळाली तातडीने निधीसह मंजुरीआ.संदिप क्षीरसागरांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
तुलसी महाविद्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन



भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एस.आय.आर.)-2026 कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्हाभर घरपोच गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म) वाटप मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेला गवळवाडी येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार्‍या या उपक्रमाला अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील आणि उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयातून गती देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः बीड शहरात घरोघरी भेट देत या अभियानाचा शुभारंभ केला होता. त्याच अभियानाचा भाग म्हणून बीड तालुक्यातील गवळवाडी येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गणना प्रपत्रांचे वाटप केले तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदार यादीत समावेश होणे ही लोकशाही बळकट करण्याची मूलभूत गरज असल्याचे सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओमार्फत घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येत आहे. यामध्ये मतदारांची माहिती अद्ययावत करणे, नवीन छायाचित्रांची नोंद, मॅपिंगमधील त्रुटी दूर करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी माहितीची अचूक नोंद करण्यावर भर दिला असून उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गवळवाडी येथे तहसीलदार शेळके यांनी ग्रामस्थांना मोहिमेची उद्दिष्टे समजावून सांगितली. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, आधारविषयक माहिती व छायाचित्र अचूकपणे भरावे, असे त्यांनी स्पष्ट केले. बीएलओ व महसूल कर्मचार्‍यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून शंका निरसन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत गणना प्रपत्र भरून देण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश मस्के, सरपंच बाळासाहेब मस्के, ग्राम महसूल अधिकारी बंडू आगलावे, बीएलओ श्रीमती पाचरणे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बीएलओमार्फत घरभेटी सुरू असून प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करून ही लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

COMMENTS