Homeताज्या बातम्या

खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौर्‍यापूर्वी राजकीय वातावरण तापले; उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे प्रतिबंधात्मक ताब्यातअंजनखेड गावाला पोलिस छावणीचे स्वरूप; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, काही काळ तणावपूर्ण वातावरण

शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सारखणी दौर्‍यापूर्वी माहूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहा

जयभीमनगरात मोठ्या भावाकडून लहान भावाचा दगडाने ठेचून खून
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या
श्रीगोंदेत गाळेधारकांशी पोलिसांचा संवादसीसीटीव्ही बसविण्यासह सुरक्षा उपायांवर भर



शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सारखणी दौर्‍यापूर्वी माहूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. माहूर-किनवट मार्गावरील अंजनखेड फाट्यावर खासदार शिंदे यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा प्रयत्न झाल्याची दखल घेत पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना त्यांच्या अंजनखेड येथील निवासस्थानावरून प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले.
खराटे यांना ताब्यात घेण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष पोलीस पथकासह दोन क्यूआरटी वाहने अंजनखेडमध्ये दाखल झाली. गावातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने अंजनखेडला काही काळ पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर ज्योतिबा खराटे यांना सिंदखेड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, ही माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सिंदखेड पोलीस ठाण्यासमोर तसेच अंजनखेड फाट्यावर जमा झाले. यावेळी त्यांनी सरकारविरोधी आणि राजकीय घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. त्यामुळे काही काळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी ही कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी या कारवाईवर आक्षेप घेत, ही राजकीय दबावाची कारवाई असल्याचा आरोप केला आहे. ज्योतिबा खराटे यांना ताब्यात घेण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने त्यांच्या राजकीय प्रभावाबाबतही परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात या प्रकरणाचे पुढे कोणते राजकीय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS