Homeताज्या बातम्या

पल्स पोलिओ मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महानगरपालिकेच्या २८ केंद्रांवर लसीकरण, रेल्वे स्थानकावरही डोस

अहिल्यानगर: बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८ जू

ठाणे जमीन गैरव्यवहार
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
तीन वर्षांनंतर चोरीची ६८ हजारांची रोकड परत; शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

अहिल्यानगर: बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अहिल्यानगर महानगरपालिका, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र आणि जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भोसले आखाडा येथे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवास करणाऱ्या बालकांनाही पोलिओचे डोस पाजण्यात आले.

या विशेष मोहिमेचा प्रारंभ माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “पोलिओमुक्त महाराष्ट्र आणि पोलिओमुक्त भारत हे आपले सामूहिक स्वप्न आहे. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”

या कार्यक्रमास नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, मीना चोपडा, जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अभय मुथा, अनिल गांधी, वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख तसेच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भोसले आखाडा परिसरातील नागरिकांनी आपल्या लहान बालकांना मोठ्या उत्साहाने पोलिओचे डोस पाजले. जिजामाता नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सुमारे २८ केंद्रांवर लसीकरणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष आणि सूक्ष्म नियोजन केले होते.

याप्रसंगी बोलताना संजय गुगळे यांनी सांगितले की, “गेली चार दशके जायंट्स ग्रुप शहरात विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवत आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरण मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. ही मोहीम केवळ आरोग्य विभागाची नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.”

COMMENTS