Homeताज्या बातम्या

जायकवाडी जलाशयावर वन विभागाची मोठी कारवाई; अवैध मासेमारी विरोधात दणका, कारवाई दडपण्याचा प्रयत्न?

शेवगाव: जायकवाडी जलाशय परिसरात अवैधरीत्या लहान आकाराच्या माशांची शिकार करून त्यांची वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पैठण वन विभागाने शनिवारी

हसनापूर परिसरातील पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण करावे  शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांचे तहसीलदारांना निवेदन
शेवगावमध्ये ३६० वा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा उत्साहात
शेवगावात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; तिघांविरुद्ध गुन्हा

शेवगाव: जायकवाडी जलाशय परिसरात अवैधरीत्या लहान आकाराच्या माशांची शिकार करून त्यांची वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पैठण वन विभागाने शनिवारी (दि. २७) दुपारी दहिफळ येथे मोठी कारवाई केली. या कारवाईत लहान माशांनी भरलेली दोन पिकअप व एक आयशर अशी तीन वाहने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई वन अधिकारी वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मात्र, या कारवाईनंतर काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तसेच कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात नियमांचे उल्लंघन

जायकवाडी जलाशय हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह झोन) तसेच पक्षी अभयारण्य क्षेत्रात येतो. या परिसरात मच्छरदाणीचा वापर करून मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी असून, पक्ष्यांच्या अन्नसाखळीचे संरक्षण करण्यासाठी ५०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे मासे पकडण्यास मनाई आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून काही जण मच्छरदाणीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माशांचे बी-बियाणे नष्ट करीत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून केला जात आहे.

शेवता, सावखेडा, ताजनापूर, नवीन दहिफळ, खिर्डी, महालक्ष्मीखेडा, गंध्या, रामढव, वरखेड, लोहगाव एमआयडीसी, वज्जर, दुर्गवाडी, धनगरपट्टी, प्रवरा संगम आदी भागांतही अशाच प्रकारे अवैध मासेमारी सुरू असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या प्रकारामुळे जलाशयातील जैवविविधता तसेच पक्ष्यांच्या खाद्यसाखळीवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने या प्रकाराविरोधात प्रथमच मोठी कारवाई केल्याचे सांगितले जात असले, तरी जायकवाडी परिसरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे अवैध मासेमारी सुरू असल्याने व्यापक आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी नागरिक व मच्छीमारांकडून होत आहे.

कारवाईबाबत माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

दहिफळ येथे झालेल्या कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी पत्रकारांनी वनाधिकारी वैशाली शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. रविवारी सकाळी अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे या कारवाईबाबत अधिकृत अहवाल उपलब्ध होऊ शकला नाही. या कारवाईबाबत पैठणचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात यांना विचारले असता त्यांनी तत्काळ शिंदे यांना प्रेस नोट देण्यास सांगतो असे सांगितले, परंतु अखेरपर्यंत प्रेस नोट मिळालीच नाही.

COMMENTS