Homeताज्या बातम्या

शनिशिंगणापूरच्या महाद्वारात विशेष पल्स पोलिओ बूथ; देश-विदेशातील भाविकांच्या ४०० बालकांना दिला डोस

सोनई: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे आरोग्य विभागाच्या वतीने शनि मंदिराच्या महाद्वारात विशेष

धुळे-सोलापूर महामार्गावर रात्री दुचाकीस्वाराला लुटणार्‍या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद
सरसकट कर्जमाफीवर निर्णय न झाल्यास मराठवाडा पेटेल; आमदार रोहित पवार यांचा सरकारला थेट इशारा
बीड शहर परिसरात चालकावर प्राणघातक हल्ला करून लूट; ग्रामस्थांनी एका चोरट्याला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

सोनई: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे आरोग्य विभागाच्या वतीने शनि मंदिराच्या महाद्वारात विशेष पल्स पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आला. सुट्टीच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांसह विदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक शनिदर्शनासाठी आले होते. या संधीचा लाभ घेत महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद आरोग्य विभागाने भाविकांसोबत आलेल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देत आरोग्यसेवेचा प्रभावी उपक्रम राबविला. यावेळी शनि मंदिराच्या महाद्वारात सुमारे ४०० बालकांना मोफत पोलिओ डोस देण्यात आला.

मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असतानाही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरणाची मोहीम राबविली. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यांतील भाविकांच्या लहान मुलांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले. देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या मुलांपर्यंत ही आरोग्य सेवा पोहोचल्याने मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

या विशेष पल्स पोलिओ बूथचे उद्घाटन शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील सयाराम बानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन करत, पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक अर्जुन बुशिंगे, आशा सेविका विजया कासार, स्वाती डिके, भक्ती बानकर तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाद्वारात उपस्थित राहून भाविकांच्या बालकांचे लसीकरण केले. प्रत्येक पालकाला पोलिओ प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली.

आरोग्य विभागाने मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेऊन लसीकरण बूथवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. भाविकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले. त्यामुळे धार्मिक स्थळांवर आरोग्य सेवा पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे दिसून आले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक पाच वर्षांखालील बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस पोहोचविणे हा असून, शनिशिंगणापूरसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्रात उभारण्यात आलेल्या विशेष बूथमुळे या उपक्रमाला आरोग्य विभागाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS