बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करत लुटणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने

बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करत लुटणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून लुटीतील २३ हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी महाराज चौक, समनापूर शिवारातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर १६ जून २०२६ रोजी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. राधेश्याम नंदलाल पारीख (वय ४२, रा. विप्रनगर, पेठ बीड) हे पाली येथून बीडकडे येत असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले, मारहाण केली आणि खिशातील २३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. दरम्यान, पोलीस अंमलदार अश्पाक सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा आवेजखान परवेजखान आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची खात्री झाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने बार्शीनाका परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
चार आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त
पोलीस कोठडीत चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) आवेजखान परवेजखान (वय २५, रा. बार्शीनाका, बीड)
२) अनिकेत ऊर्फ चिक्या विश्वास डोंगरे (वय २३, रा. प्रकाश आंबेडकर नगर, बीड)
३) अविनाश शैलेंद्र ससाणे (वय २२, रा. पंचशीलनगर, बीड)
४) विवेकानंद दिलीप गलांडे (वय २६, रा. पंचशीलनगर, बीड)
आरोपींकडून लुटीची संपूर्ण रोख रक्कम आणि दोन मोटारसायकली जप्त करून त्यांना पुढील तपासासाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवळे करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, अंमलदार अश्पाक सय्यद, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, राहुल शिंदे, मनोज परजणे, अश्विन सुरवसे आणि नितीन वडमारे यांच्या पथकाने केली.

COMMENTS