पुणे: लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांनी रविवारी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांन

पुणे: लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांनी रविवारी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) केली. या प्रक्रियेद्वारे घटनेतील विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.
पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगड किल्ल्यावर नेऊन मानवी आकाराच्या पुतळ्याचा (डमी) वापर करत तटबंदीवरून खाली फेकण्याचे प्रात्यक्षिक केले आणि विविध शक्यतांची पडताळणी केली. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, घटनेपूर्वी आरोपींनी लोहगड परिसरातील धोकादायक भागांची माहिती मिळवली होती. दऱ्या, तटबंदी आणि दुर्गम मार्गांचा अभ्यास करून नियोजनबद्ध हालचाली केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर डिजिटल साधनांमधील माहिती आणि संवादांची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) तपासणी सुरू आहे. घटनेच्या दिवशी स्वतःची ओळख आणि हालचाली लपवण्यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचा संशय पोलिसांनी नोंदवला आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, अंगावरील वस्त्रे, श्रवण उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांचे शास्त्रीय परीक्षण केले जात आहे. सिया गोयलच्या कुटुंबीयांचीही सखोल चौकशी करण्यात आली असून तिच्या पालकांसह भावाकडून महत्त्वाची माहिती पोलिसांनी घेतली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांची ओळख एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यातील संपर्क वाढला. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ संचही अलीकडेच समोर आला असून, त्यामध्ये दोघे एका क्रिकेट सामन्यादरम्यान उपस्थित असल्याचे दिसते. मात्र, त्या चित्रफितीचा कालावधी आणि संदर्भ याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
केतन अग्रवाल यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड परिसरात नागरिकांनी मेणबत्ती फेरी काढून श्रद्धांजली अर्पण केली. कुटुंबीयांनी दोन्ही दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली असून आपल्या मुलासाठी न्याय मिळावा, अशी भावनिक अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, न्यायवैद्यकीय पुरावे, प्रत्यक्ष चौकशी आणि डिजिटल तपासाच्या आधारे प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
डमी पुतळा गडावरून फेकून सीन केला रिक्रिएट
लोहगडावर रविवारी पहाटे गडाच्या भिंतीवरून एक ‘डमी’ (मानवाकृती पुतळा) खाली टाकण्यात आला. १८ जून रोजी घडलेला केतनच्या हत्येचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणातील एक नवीन माहिती उघड केली आहे: सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुगलवर लोहगड किल्ल्यावरील ‘डेथ पॉईंट्स’ शोधले होते. तसेच, त्यांनी त्या ठिकाणापर्यंत जाण्याचा मार्ग आणि तिथल्या दऱ्याखोऱ्यांची माहितीही मिळवून हा खून केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

COMMENTS