Homeताज्या बातम्या

अकोलेत विद्यार्थ्यांना आरोग्य जागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन; पौगंडावस्था, मुखआरोग्य आणि व्यसनमुक्तीवर व्याख्यान

अकोले: आदिम आदिवासी आरोग्यवर्धिनी प्रतिष्ठान, श्री सुखप्रदा रुग्णालय, सह्याद्री विद्यालय आणि अकोले तालुका वैद्यकीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमा

घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू; खा. बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप
तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईची धास्ती; नांदेडच्या बाजारातून सुटे खाद्यतेल गायब, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा हिशोब कोण घेणार?
किनवट जवळील ’भूलजा’ गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; अडीच वर्षांच्या चिमुकलीसह दोघे गंभीर जखमी

अकोले: आदिम आदिवासी आरोग्यवर्धिनी प्रतिष्ठान, श्री सुखप्रदा रुग्णालय, सह्याद्री विद्यालय आणि अकोले तालुका वैद्यकीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पौगंडावस्था, मुखआरोग्य आणि व्यसनमुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रश्मी घोलप यांनी पौगंडावस्थेत मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, सकस आहाराचे महत्त्व आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत माहिती देऊन विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले. तसेच दंतचिकित्सक डॉ. प्रतीक घोडके यांनी मुखआरोग्य, दातांची निगा आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणारे गंभीर आजार आणि कर्करोगाचा धोका याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.

प्रास्ताविकात प्रदीप भाटे यांनी संस्थेच्या आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच कोतूळ येथील श्री वरदविनायक देवस्थानाच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या ‘रुग्णोपयोगी साहित्य बँक’ उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली. या माध्यमातून अपघातग्रस्त, पक्षाघातग्रस्त तसेच दीर्घकाळ अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक घायाळ, प्राचार्या सुनीता शेलार, प्रा. जनार्दन हासे, शांताराम साबळे, डॉ. सतीश वाळुंज यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालय प्रशासन, आरोग्य विभाग आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS