मुंबई: 'डेटा सेंटर्स' क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था (Ecosystem) निर्माण

मुंबई: ‘डेटा सेंटर्स’ क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था (Ecosystem) निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही, तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे अॅमेझॉनने राज्यामध्ये मोठी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हॉटेल ताज पॅलेस येथे अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या विविध संधींवर सविस्तर चर्चा केली. या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, विकास आयुक्त (उद्योग) कादंबरी बलकवडे, अॅमेझॉन एडब्ल्यूएसचे कंट्री हेड संदीप दत्ता, अॅमेझॉन ग्लोबलचे कंट्री हेड समीर कुमार, एडब्ल्यूएसचे पब्लिक पॉलिसी संचालक विक्रम श्रीधरन आणि ग्लोबल अॅमेझॉनचे उपाध्यक्ष धर्मेश मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.
२०३० पर्यंत ‘वन ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देशातील अग्रणी राज्य असून सध्या राज्याची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलर्स इतकी आहे. राज्याने २०३० पर्यंत ‘वन ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था होण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून, त्यापैकी अर्ध्याहून अधिक टप्पा राज्याने आधीच पार केला आहे. सध्या राज्याच्या शासन व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) उपयोगावर आधारित विविध प्रयोग केले जात आहेत, ज्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ व सहजरित्या मिळतील.
कौशल्य विकासासाठी अॅमेझॉनसोबत कामाची तयारी
कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक व्यवस्थांची उभारणी केली जात आहे. एआय तंत्रज्ञानामुळे भविष्यातील रोजगाराचे स्वरूप बदलत असल्याने यावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन या कौशल्य विकास मोहिमेत अॅमेझॉनसोबत काम करण्यास अत्यंत उत्सुक आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये (MSME) महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून, या क्षेत्रासाठी एआय-आधारित आवश्यक ती परिसंस्था राज्यात वेगाने विकसित केली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS