चकलांबा: बीड जिल्ह्यातील अग्रगण्य ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या चकलांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद माध्यमिक



चकलांबा: बीड जिल्ह्यातील अग्रगण्य ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या चकलांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची दयनीय अवस्था समोर आली आहे. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून वाढलेले गवत, प्लास्टिकचा कचरा, सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
‘स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावरच आहे का?’ असा सवाल उपस्थित करत माजी ग्रामपंचायत सदस्य शाम महादेव खेडकर यांनी ग्रामपंचायत व प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गंभीर परिस्थितीबाबत ग्रामस्थ शाम खेडकर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांकडे विचारणा केली असता, कर्मचार्यांनी अनेक महिन्यांपासून नियमित पगार मिळत नसल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे. पगारच मिळत नसेल तर आम्ही झाडू कसा मारणार आणि कुटुंब कसे जगवणार? अशी हतबल प्रतिक्रिया कर्मचार्यांनी दिल्याचे खेडकर यांनी सांगितले.
शाळेच्या गेटच्या आत-बाहेर तसेच वर्गखोल्यांच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कुजलेले अन्न, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे डास, माशा व कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया, कावीळ, टायफॉइड यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. ज्या शाळेत मुलांना स्वच्छता आणि आरोग्याचे धडे दिले जातात, त्याच शाळेची अशी अवस्था असणे दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. चकलांबा ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही गावातील प्रमुख शैक्षणिक संस्थेची अशी अवस्था झाल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छता निधी कुठे खर्च झाला आणि कर्मचार्यांचे वेतन का थकले? याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्य शाम महादेव खेडकर यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, शाळा प्रशासन, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घालून शाळा परिसराची स्वच्छता करावी. स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी आणि कर्मचार्यांचे वेतन थकवणार्या जबाबदारांवर कारवाई करावी. आठ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर पालकांना सोबत घेऊन आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभाग, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे चकलांबा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाला तीन सवाल :
१. अग्रगण्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी पगाराविना का?
२. स्वच्छता अभियानाचा निधी गेला कुठे?
३. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण?

COMMENTS