बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी शैक्षणिक समूहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याव

बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी शैक्षणिक समूहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शारीरिक शिक्षण संचालक तथा योग प्रशिक्षक डॉ. सुनील जोंधळे यांनी योगाचे महत्त्व विषद करत विद्यार्थ्यांना निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
मार्गदर्शन करताना डॉ. जोंधळे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. नियमितपणे दररोज किमान एक तास योग, प्राणायाम आणि ध्यानासाठी दिल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो. योग ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची प्रक्रिया नसून मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर डॉ. जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संकल्प केला. या कार्यक्रमाला तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन तसेच तुलसी शैक्षणिक समूहातील विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या पार पाडले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS